New Delhi : नवी दिल्ली : भारतीय नौदलात सेवा करून निवृत्त झाल्यानंतर कतार येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या ८ माजी नौदल अधिकार्यांना गेल्या वर्षी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. या आठही जणांना कतारमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.यामध्ये राष्ट्रपती पदक विजेता कमांडर पूर्णेंदू तिवारी यांचाही समावेश होता.
मात्र आ़़ज न्यायालयाने त्यांची शिक्षा कमी केली असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून दिली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दाहरा ग्लोबल प्रकरणात कतारच्या अपील न्यायालयाच्या आजच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली आहे, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. आम्ही सविस्तर निर्णयाची वाट पाहत आहोत. कतारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी आज अपीलीय न्यायालयात उपस्थित होते. यात पीडितांचे कुटुंबीयही होते. खटल्याच्या सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू. प्रकरणाचे गांभीर्य आणि आवश्यक गोपनीयता लक्षात घेता, यावेळी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.”
हे आठही जण दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अॅन्ड कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीत काम करत होते. रॉयल ओमान एअर फोर्सचे निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल अजमी हे या कंपनीचे सीईओ आहेत. ही कंपनी कतारमधील संरक्षण, सुरक्षा आणि इतर सरकारी संस्थांचे काम करते.
Discussion about this post