पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | शहरात कोयता गँगकडून दहशत माजविण्याचे सत्र सुरू आहे. आता ग्रामीण भागात कोयता उगारून दहशत माजविण्याचे सुरू झाले आहे. नगर रस्त्यावरील शिक्रापूर भागात कोयते उगारून समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत माजविणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.
या प्रकरणी ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (वय २३), दुर्वेश शिवाजी क्षेत्री (वय २३), दिलावर सुभान शेख (तिघे रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कुंभार, क्षेत्री, शेख यांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. तिघांनी कोयते उगारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तिघे जण कोयता, तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्वरित कारवाई केली. आरोपी ओंकार कुंभारला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार दुर्वेक्ष क्षेत्री, दिलावर शेख कोयता रस्त्यावर टाकून पसार झाले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपअधीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक फाैजदार जितेंद्र पानसरे, श्रीमंत होनमारे, अमोल दांडगे, मिलिंद देवरे आदींनी ही कारवाई केली.
Discussion about this post