व्हीएसआरएस न्युज आकुर्डी -कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जात असताना शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षमतेने कार्यान्वित असून महापालिकेने नव्याने सुरु केलेली आकुर्डी रुग्णालये यासाठी महत्वपुर्ण ठरतील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
आकुर्डी येथील ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आणि थेरगांव रूग्णालय कोविड १९ रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यासाठी आज खुले करण्यात आले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आकुर्डी येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य प्रमोद कुटे, नगरसदस्या शैलजा मोरे, मिनल यादव, वैशाली काळभोर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे आदी उपस्थित होते.
आकुर्डी येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मानले.