व्हीएसआरएस न्युज पुणे -जिल्ह्यात आतापर्यंत 16 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहे.
त्यामधून 12 हजार 994 एलपीएम उत्पादन क्षमता वाढली आहे. तर, आणखीन 43 प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे हे सर्व प्लांट कार्यान्वित झाल्यावर जिल्ह्यात एकूण 41 हजार 762 एलपीएम उत्पादन क्षमता वाढणार आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे बंद पडलेले प्लांट उभे करून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामध्ये पुन्हा ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे.
त्यामध्ये सीएसआर, डीपीसी यासह अन्य निधीतून ते उभारण्यात येत असून, आतापर्यंत 16 प्लांट कार्यान्वित झाले आहे.
त्यामध्ये पुणे शहर कार्यक्षेत्रात 6, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात 2 तर ग्रामीणमध्ये 8 प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहे. आणखीन 43 प्लांटचे काम सुरू असून, त्यामध्ये पुणे शहरात 11 प्लांट असून, त्यातील 8 प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आला आहे. तर, तीन ठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 5 प्लांट उभारण्यात येत असून, त्यामध्ये 2 मनपा खरेदी आणि 3 सीएसआरमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीणमध्ये 25 प्लांट उभारण्यात येणार असून, काम प्रगतीपथावर आहे. त्यातील 8 प्लांट येत्या आठ दिवसांत कार्यान्वीत होतील, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Discussion about this post