व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आतापर्यंत 64 हजार 572 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले. राज्यातील विविध शाळांमधील अद्यापही 32 हजार 112 जागा रिक्त आहेत. राज्यातील 9 हजार 432 शाळांनी ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली. या शाळांमध्ये 96 हजार 684 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी काढलेल्या लॉटरीत 82 हजार 129 बालकांचा समावेश झाला होता. यातील 61 हजार 532 जणांचे शाळांमध्ये प्रत्यक्षात प्रवेश झाले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरू झाली. यातही पुणे, सातारा, रायगड, जालना, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांमधील ही प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली नसल्याची बाब उघड झाली आहे. प्रतीक्षा यादीतून 10 हजार 197 बालकांची निवड झाली. यातील 2 हजार 760 बालकांचे तात्पुरते प्रवेश झाले आहेत. तसेच केवळ 3 हजार 40 बालकांचे प्रवेश शाळांमध्ये निश्चित झाले.
प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊन मुळे, बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि ऑनलाइनद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुदतीनंतर प्रतीक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Discussion about this post