व्हीएसआरएस न्युज वनाज ते आयडियल कॉलनी या मेट्रो टप्प्याची चाचणी करण्यात आली. या ऐतिहासिक नगरीचा आधुनिक इतिहास लिहितांना पुणे मेट्रो रेल्वेचे काम आणि तांत्रिक चाचणी यांचा (‘ट्रायल रन’चा) उल्लेख करावा लागेल.
मेट्रो’मुळे पुण्याला नवी आणि आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोचले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, अजित पवार यांनी ३० जुलै या दिवशी केले. पुणे मेट्रोने उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
१. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहने, वाहतूक आणि प्रदूषण यांचा ताण न्यून होईल. त्यातून वाहतुकीची कोंडी सुटण्यास साहाय्य होईल.
२. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेअंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिकेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. एकूण ५ कि.मी. लांबीचा हा टप्पा आहे. या मार्गावर मेट्रोने यापूर्वीही सरावपूर्व चाचणी घेतली होती.
३. ऑक्टोबर अखेरपर्यंत वनाज ते रामवाडी या मार्गिकेचा काही भाग चालू करण्याचा सत्ताधारी पक्षाचा आग्रह आहे.
४. दळणवळण बंदी असतांनाही महामेट्रोने या मार्गावरील कामे वेगाने चालूच ठेवली होती. वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गिकेवर मेट्रो धावण्याची चाचणी घेण्यासही प्राधान्य देण्यात आले होते.
५. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रोची मार्गिका शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत आणि तेथून पुढे स्वारगेटपर्यंत भूमीगत आहे. भूमीगत मेट्रो मार्गिकेचे कामही वेगात चालू आहे.
६. नदीपात्राखालूनही महामेट्रोने भूमीगत मार्गिकेसाठी बोगदा निर्मिती करण्याचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण केला आहे.
शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोर दरम्यान १९.७४ किलोमीटर, हडसपर बस डेपो ते सासवड रेल्वे स्टेशन ५.६१ किलोमीटर आणि स्वारगेट ते रेसकोर्स ३.७० किलोमीटर, अशा एकूण सुमारे २९ .१४ किलोमीटर लांबीच्या तीन मेट्रो मार्गांचे अंतिम अहवाल दिल्ली मेट्रोकडून पीएमआरडीएला सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएकडून सुमारे ५२ किलोमीटर लांबीच्या मार्गांवर मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रोचा प्रकल्प हाती घेतला आहे. शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. हडपसर परिसरातील लोकसंख्या मोठी आहे.
या भागातून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागासह हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी, असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर ते फुरसुंगी दरम्यान असलेला मेट्रो मार्ग लोणीकाळभोरपर्यंत वाढविण्यात यावा, अशा सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील मेट्रोचा सुधारित अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना पीएमआरडीएने दिल्ली मेट्रोला दिल्या होत्या.
दिल्ली मेट्रोने या संदर्भातील अंतिम अहवाल पीएमआरडीएला नुकताच सादर केला आहे. लोणी काळभोरपर्यंत मार्ग प्रस्तावित करताना त्याला हडसपर ते सासवड रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट ते रेसकोर्स, असे दोन कनेटीव्ही देखील दिल्या आहेत. त्यामुळे स्वारगेटवरून लोणीकाळभोर आणि हडपसर, तर शिवाजीनगर येथून लोणीकाळभोर आणि सासवड दरम्यान मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.
शिवाजीनगर कोर्ट ते लोणीकाळभोर या मार्गावर १९, हडसपर बस डेपो ते सासवड रेल्वे स्टेशन या मार्गावर ४ आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गावर ३, असे असे मिळून २६ स्टेशन असणार आहेत. हे सर्व मार्ग इलेव्हेटेड असणार आहे. या मार्गावर हा मार्ग उभारण्यासाठी अंदाजे साडेसात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
Discussion about this post