व्हीएसआरएस न्युज पुणे-श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मि. प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. उत्सवकाळात देखील मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरुन बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
यंदाचे वैशिष्टय – आॕगमेंटेंड रिअॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर
आॅगमेंटेंड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. याकरीता ट्रस्टतर्फे दिलेल्या http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.
Discussion about this post