व्हीएसआरएस न्युज पुणे – कसोटी पाठोपाठ टी-20 सामन्यांची मालिका जिंकलेल्या भारतीय संघाचा आज येथील गहुंजे मैदानावर इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेतही विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सातत्य कायम राखावे लागणार आहे.
भारतात दाखल झाल्यापासून इंग्लंड संघाने चांगली लढत दिली असली तरीही त्यांना आधी कसोटी तर नंतर टी-20 सामन्यांची मालिका गमवावी लागली.
या मालिकेत इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच भारताला खरी लढत दिली. त्यांचे भरवशाचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरल्यामुळे त्यांना चांगल्या सुरूवातीनंतरही सामने जिंकता आले नाहीत. त्यांनी कसोटी व टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी मात्र, हेच विजयी सातत्य त्यांना नंतरच्या सामन्यांमध्ये दाखवता आले नाही व त्यामुळेच या दोन्ही मालिका त्यांना गमवाव्या लागल्या.
जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर व काही प्रमाणात अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी सरस कामगिरी केली मात्र, त्यांच्या गोलंदाजांना भारताच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखता आले नाही. त्यांचे गोलंदाजही संभ्रमात असल्याचे स्पष्ट दिसून आले. मार्क वूडकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्याने सातत्याने निराशाच केली. तसेच लेग स्पीन गोलंदाज आदिल रशिद याला काही प्रमाणात मर्यादित षटकांच्या सामन्यांत यश मिळाले परंतु ते पुरेसे नव्हते. आता त्यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जाफ्रा आर्चर याने या मालिकेतून माघार घेतल्यामुळे भारताच्या फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांपासून अडचणीत आणण्यात ते अपयशी ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.
दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. कसोटी मालिकेपाठोपाठ टी-20 मालिका जिंकल्यामुळे सर्व खेळाडू एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीही सज्ज बनले आहेत. भारताची फलंदाजी खोलवर असली तरीही अखेरच्या पाच फलंदाजांना संघासाठी उपयुक्त कामगिरी करावी लागणार आहे.
सलामीचा प्रश्न पाचव्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सोडवला. मात्र, आता एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो सलामीला येण्याची शक्यता खूपच कमी आहे. हिटमॅन रोहित शर्मा पाचव्या टी-20 सामन्यातील अफलातून खेळीने भरात आल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. त्याच्यासह डावाची सुरूवात कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. संघात शिखर धवन असल्यामुळे त्याला रोहितसह सलामीला पाठवणार की शुभमन गिलला संधी देणार हे महत्त्वाचे ठरेल कारण धवनला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.
कर्णधार कोहली, रोहित, नवोदित सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. त्यातच एकदिवसीय सामन्यांत पदार्पण करण्यासाठी सज्ज बनलेला सूर्यकुमार यादव प्रचंड भरात असल्याने भारताला मधल्या फळीतील फलंदाजाची चिंता मिटली आहे. गोलंदाजीतही पाहुण्यांपेक्षा भारतीय संघच जास्त सरस आहे. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्यापैकी दोन गोलंदाजांना अंतिम संघात संधी मिळेल.
टी-20 मालिकेत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भुवनेश्वरच्या जोडीला ठाकूरचा समावेश निश्चित मानला जात आहे. तसेच फिरकी गोलंदाजीची मदार यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांच्यावरच राहणार आहे. हा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.
इंग्लंडचा संघ कसोटी, टी-20 व एकदिवसीय अशा तिनही प्रकारात सामने खेळण्यासाठी भारतात दाखल झाला होता. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत तर उर्वरीत दोन सामने तसेच संपूर्ण टी-20 मालिका अहमदाबादमध्ये खेळवली गेली. आता संपूर्ण एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे.
असे असेल वातावरण
आज दुपारी १.३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात दिवस गरम स्वरूपाचा राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. २५ टक्के आद्रतेसह तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके राहील. पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र, सायंकाळच्या वेळी ढग दाटून येऊ शकतात.
अशी असेल खेळपट्टी
पहिल्या सामन्यासाठी वापरण्यात येणारी एमसीए स्टेडियमवरील खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल.
मात्र, सामना पुढे सरकल्यानंतर ती फिरकी गोलंदाजांना मदत करेल. तरीही सामन्यात फलंदाजांचा दबदबा राहील. या मैदानावर ५० टक्के सामने हे धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा तितकासा प्रभाव पडणार नाही. तरीही, धावांचा पाठलाग करणे काहीसे सोपे जाईल.
या सामन्यात भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाजांचा उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघाला मालिकेपूर्वी धक्का बसला असून, अनुभवी फलंदाज जो रूट व टी२० मालिका गाजवणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मायदेशी परतले आहेत.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल.
वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
ओएन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (उपकर्णधार व यष्टीरक्षक), जेसन रॉय, लियाम लिव्हींगस्टोन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, सॅम करन, टॉम करन, मोईन अली, मार्क वूड, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद व रिसे टोप्ले.