व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील ९६ आधार केंद्र चालकांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्याने संबंधितांचे आधारची कामे करण्याचे परवाने गोठविण्यात आले होते.
तसेच त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये ८२ केंद्रचालक परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, यूआयडीएआयकडून या ८२ केंद्र चालकांना आधारची कामे करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील ९६ आधार केंद्रे अद्यापही बंदच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बँक, नोकरी, शिक्षण, व्यवसायासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. आधारमधील पत्ता, नाव, वय, लिंग, छायाचित्र आदींमधील बदल करायचा असल्यास आधार अद्ययावतीकरण किंवा नव्याने आधार नोंदणी करण्याबाबत यूआयडीआयकडून सातत्याने मार्गदर्शक सूचना प्राप्त होत असतात. त्यानुसार आधार नोंदणी, अद्ययावतीकरण करताना यंत्रचालकांनी ग्राहकांकडून कागदपत्रे घेणे आणि ती यूआयडीएआयच्या संगणकप्रणालीत अपलोड करणे अपेक्षित असते. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरीत ग्रामीण भागातील ९६ आधार केंद्रचालकांकडून यूआयडीएआयच्या सूचनांचे पालन वारंवार केले जात नाही, म्हणून त्यांचे परवाने तात्पुरते काढून घेण्यात आले होते. तसेच संबंधित यंत्रचालकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन चाचणी घेण्यात आली.
Discussion about this post