व्हीएसआरएस मराठी न्युज –संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरूणांनी सभागृहात उडी मारली आणि बेंचवरून उड्या मारत सभापतींच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी स्मोक कँडल जाळल्याने सर्वत्र पिवळा धुर पसरला होता. सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आल्याने ही घटना देशभरात चर्चेचा विषय झाली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील उमटले. विधीमंडळातील सुरक्षेसंदर्भात यावेळी अध्यक्षांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आज अधिवेशनात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेत घडलेली घटना सांगितली आणि विधीमंडळातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत म्हटले की, आपणही याबाबत काळजी घ्यायला हवी. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधीमंडळाचे पासेस कमी करायला हवेत. यावर अध्यक्षांनी म्हटले की, मी जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही.
Discussion about this post