व्हीएसआरएस मराठी न्युज –संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज मंगळवारपासून (आज) नव्या इमारतीत होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानंतर आता विधानसभा आणि लोकसभेत देखील महिलांना आरक्षण मिळणार असून देशाच्या इतिहासातील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनात होणाऱ्या विशेष सत्रादरम्यान हे विधेयक लोकसभेत मांडले जाऊ शकते.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी महिला आरक्षण विधेयकासंदर्भात माहिती दिली आहे. महिला आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचे नैतिक धैर्य फक्त मोदी सरकारमध्ये आहे, हे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सिद्ध झाले, असे ट्विट त्यांनी केले. त्यांनी लिहिले, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचे अभिनंदन.
महिला आरक्षण विधेयकाबाबत मोदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, काँग्रेस पक्ष दीर्घ काळापासून महिला आरक्षण लागू करण्याची मागणी करत आहे. आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि विधेयकाच्या तपशीलाची वाट पाहत आहोत. विशेष अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत यावर सखोल चर्चा होऊ शकली असती आणि पडद्यामागच्या राजकारणाऐवजी एकमत होऊ शकले असते.
Discussion about this post