व्हीएसआरएस मराठी न्युज –जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही फ्रांस (ल्योन) येथे होणार असून देशातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. यापूर्वी ४६व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागातून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट झाले होते. स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी गुगल प्ले स्टोअर (Google play store) मधून ‘स्कील इंडिया डिजीटल’ (skillindiadigital) हे ॲप डाऊनलोड करावे. या ॲपमध्ये नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होता येईल.
स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणीकृत उमेदवारांना कळविण्यात येईल. काही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर १७५ श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा.
Discussion about this post