व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –रविवारी रात्री ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेजच्या जवळच महामार्गा शेजारील मैदानात टँकर मधून गॅस चोरी करतानाच मोठा स्फोट झाला. बॉम्ब स्फोटासारखे नऊ मोठे धमाके झाले. शेजारील इमारती हादरल्या. जेएसपीएम शाळेतील तीन बसेस जळून खाक झाल्या. गॅस चोरणारे चोरटे पळून गेले आणि आता पोलिस तपास करत आहेत.
शहरात अशा प्रकारे गॅस रिफिलिंग कऱताना थेरगाव, चिखली, चिंचवड, पिंपरी येथे दुर्घटना झाल्या. तीनही घटनांतून तीन कंत्राटी कामगार दगावल्याच्या बातम्यासुध्दा आल्या होत्या. अशा परिस्थिती प्रशासनाला कुठलेच गांभीर्य दिसत नाही. आजही निवासी भागातील गॅस गोदामांतून गॅस चोऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळ्या आहेत. महसुलच्या अधिकार्यांना याची कल्पना असूनही कारवाई होत नाही.
वाल्हेकरवाडी येथील स्वामी विवेकानंद कॉलनीत गेले तीन वर्षांपासून एक गॅसचे मोठे गोदाम भर वस्तीत आहे. भरलेल्या सिलेंडर टाक्यांचे सात-आठ ट्रक तिथे उभे असतात. भरलेले कमर्शियल सिलेंडरसुध्दा मोठ मोठ्या टाक्यांतून या ठिकाणी ठेवले जातात. तिथेही गॅस रिफिलिंगचा उद्योगसुध्दा रात्रभर चालतो. नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यावर पाहणीत तिथे गॅस रिफिलिंगची मशिनरीसुध्दा आढळून आल्या होत्या. निवासी भागातील हे बेकायदा गोदाम त्वरीत बंद करा म्हणून स्थानिक नागरिकांनी मिळून आपल्या महसुल खात्याला लेखी निवेदनही दिले होते. आता महसूल खाते कारवाईसाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडे बोट दाखवते हे बरोबर नाही. तीन महिन्यांपूर्वी निवासी भागातील गॅस गोदामावर महसुल खात्यानेच फौजदारी गुन्हा दाखल केला होता मग आता इथे कारवाई का होत नाही. शहरातील निवासी भागात असलेली सर्व गॅस गोदामे बंद करून नागरिकांचा जीव वाचवावा लोकांच्या जीवाशी खेळू नका. ताबडतोब या गोदामाला सिल लावून फौजदारी गुन्हा दाखल करावा,अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी अप्पर तहसीलदार डॉ अर्चना निकम यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
Discussion about this post