व्हीएसआरएस मराठी न्युज -अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले.
सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणीहून उभं राहून राष्ट्रगीताचं गायन केलं. दरम्यान, यामध्ये सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं. त्याप्रमाणं राज्याच्या विविध भागात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आलं.
सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं होतं. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं.
राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली होती. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला होता. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी परिपत्रक देखील जारी करण्यात आलं होतं.
राष्ट्रगीताच्या या समूह गायनाचा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र साजरा झाला. त्यात सर्व अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित केल आहे.
नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहे. त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती दिनेश यादव यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुदळवाडीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक ८९ मध्ये “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत बुधवारी सकाळी ठीक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले. यात माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन, विद्यार्थी, शिक्षकवर्ग सहभागी झाले होते.
Discussion about this post