व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पुण्यातील दोन्ही आमदारांसह जिल्ह्यातील पाच आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या; तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, अन्य प्रश्न, रखडलेले प्रकल्प याबाबत पवार आठवडय़ातून एकदा बैठक घेत होते. महाविकास आघाडीमध्ये पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मोठा निधी मिळवून दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांवर वर्चस्वासाठी रंगत पाहायला मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महापालिकांमध्ये अजित पवार यांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता असून, त्यांची प्रशासनावरील पकड, कामाचा झपाटा पाहता पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि भाजपची कसोटी लागणार आहे.
Discussion about this post