व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-चिंचवड शहरात चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच डेंग्यूबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत असून सप्टेंबर महिन्यामध्ये ४० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या डेंग्यूमुळे चिखलीतील जाधववाडीत डेंग्यूसदृश आजाराने पाच आणि दहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही उपचारासाठी पुण्यात दाखल होते. त्यांचे डेंग्यू चाचणी अहवाल नकारात्मक आहेत. पण, लक्षणे डेंग्यूची होती.
जाधववाडीतील पाचवर्षीय बालकाला डेंग्यूसदृश आजारामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने १९ सप्टेंबर रोजी बालकाचा मृत्यू झाला.
तर, जाधववाडीतीलच १० वर्षीय मुलीला डेंग्यूसदृश आजारामुळे ४ सप्टेंबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
याप्रकरणा संदर्भात पिंपरी-चिंचवडचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, चिखली जाधववाडीतील मृत्यू झालेल्या दोन्ही बालकांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे होती. त्यांचे डेंग्यू चाचणी अहवाल नकारात्मक आहेत. दोघेही उपचारासाठी पुण्यात होते. त्यांच्या वैद्यकीय अहवालाद्वारे इतर माहिती घेतली जात आहे. तर आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरात डेंग्यू, चिकुनगुण्या तसेच हिवताप यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. आठवड्यातून किमान एक कोरडा दिवस पाळावा.
Discussion about this post