व्हीएसआरएस मराठी न्युज –दिवाळी दोन दिवसांवर आली तरी रेशन दुकानांवर सवलतीच्या दरात देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ पिंपरी तील बहुतांश कुटुंबांना मिळालेला नाही. त्यामुळं फराळ कधी करायचा ही चिंता सर्वसामान्य घरातील गृहिणींना लागली आहे.
नाइलाजानं काहींनी फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी इतरत्र सुरू केली आहे.
सण-उत्सवाच्या प्रसंगी सर्वसामान्यांना गोडधोड करता यावा आणि सणवार आनंदात साजरे करता यावेत या हेतून राज्य सरकारनं आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत रेशन दुकानांवर महत्त्वाच्या जिन्नस अवघ्या १०० रुपयांत दिल्या जातात.
याआधी आनंदाच्या शिध्यामध्ये रवा, चना डाळ, साखर, खाद्य तेल हे जिन्नस मिळत होते. त्यात आता आणखी दोन जिन्नसांची भर पडली आहे. पोहे आणि मैदा देखील दिला जाणार आहे. त्यामुळं यंदा दिवाळीला फराळ करताना याचा उपयोग होईल अशी आशा होती. मात्र, अनेक घरांमध्ये अद्यापही हा शिधा पोहोचलेला नाही.
दिवाळीसाठी राज्यातील घराघरांत करंजा, लाडू, चकली, शंकरपाळी, चिवडा असे पदार्थ बनवले जातात. शिध्यामध्ये मिळणारा जवळपास प्रत्येक जिन्नस यात वापरला जातो. त्यामुळं गृहिणी शिध्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अजूनही अनेक रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा आलेला नाही. गृहिणी रेशन दुकानदारांकडं विचारपूस करत आहेत. त्यावर केवळ ‘येईल दोन-तीन दिवसांत’ एवढंच उत्तर मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा राज्य शासन अन्न आणि नागरी पुरवठा विभाग ह्यांनी आनंदाचा शिधा दिला नसून फक्त १०० रुपये मध्ये आनंदाचा शिधा राज्य सरकार मार्फत देण्याची घोषणा केली आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना फक्त साखर मैदा व तेल ह्या तीन वस्तू शहरातील रेशनिंग दुकान मध्ये देण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवड शहरातील निगड परिमंडळ भागात ३७ हजार ७३१ तर भोसरी परिमंडळ भागात ४३ हजार ४२६ इतक्या मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येणार असून एकूण ८१ हजार १५७ लाभार्थी पिंपरी चिंचवड शहरातील असून राज्य सरकार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना यंदाही फक्त १०० रुपये मध्ये पाच वस्तू देण्याची घोषणा केली आहे पण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाच वस्तू शिधा स्वरुपात भेटल्या नाही आपण स्वतः दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधा मिळावा ही अपेक्षा सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी व्यक्त केली आहे.
गुरुवार, ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. ९ तारखेला वसुबारस आहे. एकदा उत्सव सुरू झाला की फराळ करायला वेळ मिळणार नसल्यानं गृहिणी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. आनंदाचा शिधा न मिळाल्यामुळं त्यांनी रवा, मैदान, साखर अशा जिन्नसांची इतरत्र खरेदी सुरू केली आहे. त्यामुळं आनंदाचा शिधा मिळाला तरी तो खराखुरा आनंद देऊ शकेल का, हाच प्रश्न आहे.
Discussion about this post