व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे.
नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील दुसरा रोजगार मेळावा येत्या १० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘2nd PLACEMENT DRIVE-PUNE’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार १० मे रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-११ येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.
Discussion about this post