व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये शून्यातून सुरुवात करीत विकासकामांच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भुमिका, शिस्तबध्द दैनंदिनी व नियोजनबध्द कामाची आखणी म्हणून लक्ष्मण जगताप यांना ओळखले जाते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनाला हाताळण्याचे वकुब हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यशैलीतून उभ्या पिंपरी चिंचवड शहराने पाहिले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आणण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांनी केलेला चिंचवड मतदारसंघाचा विकासच त्यांचे कर्तृत्व दाखवून देतो.
त्यांनी आजवर अनेक विकासकामांवर भर देत आपला मतदारसंघ वेगाने सुधारित करून त्याचा कायापालट करून विकासाची खरी व्याख्या शहराला दाखवुन दिली. शहरात महाआरोग्य शिबिरे घेऊन हजारो रुग्णांना योग्य उपचारासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्यांचा अनधिकृत निवासी बांधकामांना आकारला जाणारा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याची लक्षवेधी आमदार लक्ष्मण जगताप काही वर्षांपूर्वी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती, प्रसंगी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला होता. अलीकडेच त्यांची तब्येत बरी नसल्याने ते सध्या उपचार घेत आहेत. आताच्या राज्यसभा तसेच विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी रुग्णशय्येवर असतानाही आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना झाले होते. पक्षाची बांधिलकी व आपले कर्तव्य म्हणुन त्यांनी सलग दोनवेळा मतदानाचा हक्क बजावुन सर्वांची मने जिंकली हे सर्वज्ञात आहे. यातून त्यांची आपल्या पक्षाची व सामाजिक तळमळ दिसून आली होती. तसेच या निवडणुकांच्या विजयानंतर हा विजय लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला, अशा शब्दात माजी विरोधी पक्षनेते व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आमदारांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले होते. त्यांची प्रकृती सध्या खालावली असली तरी ते त्यावर मात करून लोकसेवेसाठी पुन्हा उभारी देतील, असा सर्वांना विश्वास आहे.
या सर्व घटनाक्रमातून आमदार लक्ष्मण जगताप यांची कमालीची चिकाटी, जिद्द आणि ध्येयाने वाटचाल करण्याची प्रचिती शहर वासियांना आली आहे. आज महाराष्ट्रात राजकीय घडामोडीनंतर भाजप पक्षाचे तसेच एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. पक्षनिष्ठा आणि विकासकामे करण्याची प्रचंड तळमळ असणाऱ्या या पिंपरी चिंचवड शहराच्या लोकनेत्यास मंत्रीपद देऊन उचित सन्मान करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे, तरी यावेळी विकासकामांचा दांडगा अनुभव असणा-या व पिंपरी चिंचवड शहरातील एक अनुभवी व्यक्तिमत्व असणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्य मंत्रिमंडळात योग्य संधी देण्यात यावी, तोच पिंपरी चिंचवडकरांचा योग्य सन्मान होईल अशी मी पिंपरी चिंचवड शहराचा एक नागरिक म्हणून आपणाकडून अपेक्षा बाळगतो, हीच सर्वांची इच्छा असेल. असे दिपक खैरनार यांनी म्हटले आहे.
Discussion about this post