व्हीएसआरएस मराठी न्युज –कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सप्ताहामध्ये भव्य ‘कथा कीर्तन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कीर्तन परंपरांचे सादरीकरण होणार आहे. त्यात पारंपरिक वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध परंपरांचा समावेश आहे.
भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहेंदळे व संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी या कीर्तन महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप महाराज पळसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन इन्फोसिसच्या विकास केंद्राचे ( डेव्हलपमेंट सेंटर) पुणे विभागाचे प्रमुख श्री प्रवीण व्ही.कुलकर्णी व श्री. रजनीश मालविया यांच्या हस्ते व संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Discussion about this post