Mumbai News : मुंबई : दहीसर परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची एका व्यक्तीने ८ फेब्रुवारी रोजी तीन ते चार गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. विशेष म्हणजे घोसाळकर आणि त्यांचा खुनी हे दोघेही एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. ते संपत आल्यावर घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घोसाळकर यांची हत्या करून स्वतः आत्महत्या करणार्याचे नाव मॉरीस नरोन्हा असे आहे. तो या परिसरातील स्वयंघोषित नेता होता. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घोसाळकर आणि नरोन्हा हे एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. सुमारे ४० मिनिटे हे प्रक्षेपण सुरू होते. ते संपत आल्यानंतर नरोन्हा उठून दुसर्या खोलीत गेला. त्याने पिस्तूल आणले आणि घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेत त्याने आत्महत्या केली.
गंभीर अवस्थेत घोसाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या शरीरातील गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया चालू असतानाच जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार घोसाळकर आणि नरोन्हा यांच्यात आर्थिक व्यवहारातून वितुष्ट आले होते. मात्र, अलिकडे वाद मिटल्याने ते पुन्हा एकत्र आले होते. या घटनेमागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.पोलीस अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post