व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणेमहानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल.
तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्रीे एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर आणि मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.
Discussion about this post