व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नुकताच 55 कोटी रुपयांचा दिवाळी बोनस (साडेआठ टक्के सानग्रह अनुदान प्लस वीस हजार रुपये बक्षीस म्हणजे एक पगार) जाहीर झाल्याने त्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.
तशीच आनंदाची बातमी राज्यातील 104 पोलीस निरीक्षकांना राज्य सरकारने दिली. त्यांना एसीपी (डीवायएसपी) म्हणून प्रमोशन दिल्याने त्यांचीही दिवाळीअगोदरच दिवाळी झाली आहे. त्यात सहाजण पिंपरी-चिंचवडमधील आहेत.
दरम्यान, आजची प्रमोशन ही उशीरा निघाली आहेत. त्यातही ओपन पोलीस निरीक्षकांना, तर त्यासाठी खूप वाट पहावी लागली आहे. तरी, देर आये, दुरुस्त आये, या न्यायाने त्यांनी त्याबद्दलही आनंद व्यक्त केला. प्रमोशन मिळालेल्या बहुतेक अधिकाऱ्यांना आहे तिथून दुसरीकडे, तर काहींना दूरवर पाठवण्यात आले आहेत. विवेक मुगळीकरसारखे त्याला अपवाद ठरले आहेत.
सध्या ते पिंपरी-चिंचवड पोलीस आय़ुक्तालयात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवडमध्येच ठेवण्यात आले आहे. शहरातील इतर पाच पोलीस निरीक्षकांना मात्र, बाहेर पाठविण्यात आले आहे. अनिल कोळी आणि मुगुटलाल पाटील हे बाहेरील दोन पीआय प्रमोशनवर एसीपी म्हणू्न शहरात आले आहेत.
प्रमोशन मिळून सहापैकी पाच पीआय शहराबाहेर गेले. त्यातील चारजण हे पोलीस ठाण्यांचे इन्चार्ज होते. त्यामुळे त्यांच्या जागी नवे सिनिअर पीआय म्हणून उद्याच काही पीआय़ शहरात बदलीवर येण्याची शक्यता आहे.
भोसरी आणि तळेगाव पोलीस ठाण्याचे सिनिअर पीआय भास्कर जाधव आणि सत्यवान माने यांची पुण्यात ‘सीआयडी’मध्ये डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे. निगडीचे सिनिअर पीआय रंगनाथ उंडे यांना पुणे शहर पोलीस दलात, तर शहर कंट्रोल रुममधील पीआय रवींद्र जाधव यांना, मात्र थेट चंद्रपूरला गडचांदूरचे डीवायएसपी म्हणून पाठवण्यात आले आहे. सहावे पीआय दीपक शिंदे यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
Discussion about this post