व्हीएसआरएस मराठी न्युज –
उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी आणि धरणातील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर तूर्त पाणीकपात टळली असली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तूर्त नव्याने नळजोड न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
तसेच वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने संबंधित अभियंत्यांना दिले आहेत.
धरणातील पाण्याच्या नियोजनासंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत धरणातील पाण्याचा आढावा घेतानाच पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी तूर्त नव्याने नळजोड न देण्याबाबतचे कार्यालयीन परिपत्रक काढले.
उन्हाचा चटका वाढत असून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. अस्तित्वातील नळजोडांना आवश्यक तो पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने नळजोड मंजूर न करण्याची भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत नव्याने नळजोडांना परवानगी देण्यात येऊ नये, असे अनिरूद्ध पावसकर यांनी कार्यालयीन परिपत्रकात नमूद केले आहे.
Discussion about this post