Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ मध्ये आज दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट २ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ३३ उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली असून निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.
या निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. तर ३ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले होते. विहित मुदतीत २ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे उर्वरीत ३३ उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९० मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मतराव खराडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार अभिजीत जगताप, मनिषा तेलभाते, सचिन मस्के यांच्यासह नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनूसार पार पडली.
Discussion about this post