Pimpri News : पिंपरी : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीतर्फे चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात आहे.त्या विरोधात आणि भाजपने पिंपरी चिंचवड आणि मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केला आहे त्याविरोधात पिंपरीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने येथील आंबेडकर चौकात आज १ फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलन केले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, आमदार रोहित पवार सुवक, महिला, शेतकरी यांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून मांडत असल्याने त्यांना ईडीमार्फत जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. भाजपला या कृत्याबद्दल मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल.
भाजपने मुंबई महापालिकेतील ६५ हजार रुपयांच्या ठेवी मोडल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचीही तीच स्थिती झाली असून पालिका ५५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या विचारात आहे. ही पाळी भाजपच्या स्थानिक आमदार व त्यांच्या नातेवाईकांमुळे आली आहे असा आरोपही कामठे यांनी यावेळी केला.
आमचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. जरूर पडल्यास तुरुंगात जाण्यासही आम्ही तयार आहोत असे कामठे म्हणाले.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, इम्रान शेख, देवेंद्र तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजप आणि ईडी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. पोलिसांनी त्यांना बाजूस करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसआणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.
Discussion about this post