Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भाडे नाकारले म्हणून दोघांनी रिक्षाचालकाला मारहाण करून त्यावर कोयत्याने वार केले.
बालाजी भानुदास गायकवाड (वय ५४ रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे वार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याने चिखली पोलीसठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य आडे, संजय मरगुडे यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३९४, ३९७. ३४ आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बालाजी गायकवाड आणि त्याचा मेहुणा हे दोघे रिक्षाने पूर्णानगर येथे एका औषध दुकानात औषध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या आरोपींनी त्यांना केएसबी चौकात सोडण्यास सांगितले.गायकवाड याने त्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी संजय मरगुडे याने त्याच्या हातात असलेली पाण्याची बाटली गायकवाड याच्या डोक्यात मारली आणि कोयत्याने डोक्यात वार केला. आरोपी आदित्य आडे याने गायकवाड याला दांडक्याने मारहाण केली.खिशातील ३३०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन रिक्षाची चावी काढून फेकून दिली.यावेळी फिर्यादीचा मेहुणा त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता त्यालाही आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बारवकर करीत आहेत.
Discussion about this post