Pimpri News : पिंपरी : पिंपरीतील मोरवाडी चौकात २७ एप्रिल रोजी पहाटे एका टँकरला अपघात झाला. यामध्ये टँकरचालक जखमी झाला. त्याला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अंकुश मस्के असे जखमी चालकाचे नाव असून ते एमएच ४३/सीई ०७८४ क्रमांकाचा टँकर जुन्या मुंबई पुणे महार्गावरून जात होते. मोरवाडीचौकानजिक टँकरला अपघात झाला. मस्के स्टीअरिंग आणि सीट यामध्ये अडकून पडले. अपघाताचे वृत्त कळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी मस्के यांची सुटका करण्यासाठी अग्निशमनदलाला बोलावले. अग्निशमनदलाचे जवान अपघातस्थळी आले. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपकरणांच्या साह्याने मस्के यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे टँकरमधील ऑईल रस्त्यावर पसरले. त्यावरून घसरून अपघात होऊ नये म्हणून अग्निशमनदलाच्या जवानांनी त्यावर माती टाकून ते साफ केले.
या मदतकार्यात फायरमन विकास नाईक, प्रतीक कांबळे, अमोल चिपळूणकर, अर्जुन जाधव, अभिषेक भांगे, श्री कुटे, श्री कंठाळे आणि इतर सहभागी झाले होते.
Discussion about this post