Pune News : पुणे : पुणे पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. यातील एका आरोपीच्या ताब्यात असलेल्या पत्र्याच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या मिठाच्या पिशव्यांमधून आता पोलिसांनी तब्बल १०० कोटी रुपयांचे ५२ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात यश मिळविले आहे. हा अमलीपदार्थ विदेशी नागरिकांनी पुरविल्याचे तपासात पुढे आले असून त्यामुळे या प्रकरणाशी आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे पोलिसांनी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय 35 वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) यांना अटक केली होती त्यांच्याकडून एकूण ५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. हैदर शेख याच्याकडे अटक केल्यानंतर एक चावी आढळली होती. ती कशाची आहे याची विचारणा पोलिसांनी त्याच्याकडे केल्यावर ती विश्रांतवाडी येथील पत्र्याच्या गोदामाची असल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनी गोदामाची झडती घेतल्यावर तेथे २०० ते ३०० मिठाच्या पिशव्या आढळल्या होत्या. या पिशव्यांची तपासणी केल्यावर त्यात मेफेड्रोन असल्याचे निष्पन्न झाले आहे्. आतापर्यंत ५२ किलो मेफेड्रोन पोलिसांनी हस्तगत केले आहे. मिठाच्या पिशव्यांआडून मेफेड्रोन विकले जात होते. हैदर शेखने हे मेफेड्रोन त्याला पॉल आणि ब्राऊन या परदेशी नागरिकांनी दिल्याचे त्याने कबूल केले आहे. त्यामुळे आता पुणे हे आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ माफियांच्या नकाशावर महत्त्वाचे ठिकाण बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post