Pune News : पुणे : नुकतीच हत्या झालेला कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला सोशल मीडियावरून धमकावल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी ससून हॉस्पिटलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.यामुळे पोलिसदलात प्रचंड खळबळ माजली आहे.नवे पोलीस आयुक्त अमितेशकुमार नुकतेच आपल्या पदावर स्थानापन्न झाले. त्यानंतर शहरातील गुंडांच्या परेड काढून त्यांनी आपल्या कर्तव्यकठोरपणाचे प्रदर्शनही केले. मात्र, आता हा आरोपी पळून गेल्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ससून हॉस्पिट्लमधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव मार्शल लुईस लीलाकर (रा.आकुर्डी) असे आहे. त्याने सोशल मीडियावर रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावले होते.त्याच्यावर अश्लील शिवीगाळ, कमेंट, प्रकरणी त्याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात भादंवि 500, 506, 509 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अन्वये गुन्हा दाखल होता.
प्रकृती ठीक नसल्याच्या कारणाने त्याला येरवडा कारागृहातून ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते.यावेळी त्याने पळ काढला. आता पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.
अमलीपदार्थ तस्कर ललित पाटील याने काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे ससून हॉस्पिट्लमधून पळ काढला होता. त्यावेळी पुणे पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती. आता या आरोपीने पळ काढल्याने पुन्हा एकदा पुणे पोलिसांचा ढिसाळ कारभार उजेडात आला असून गुंडाची परेड काढून जरब बसविण्याचे प्रयत्न मातीमोल ठरले आहेत.
Discussion about this post