व्हीएसआरएस मराठी न्युज -संत गाडगे बाबा हे कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी कोतेगाव या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या आईचे नाव सखुबाई होते.
गाडगे बाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगे बाबा हे संतांमधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रुढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण ते देत. गाडगे बाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
गाडगे बाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते.’तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा.’देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.’ अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.
माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. अशा या थोर समाजसुधारकाचे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
Discussion about this post