व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आग लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने अॅक्शन प्लॅन आखला आहे. त्यानुसार, पालिकेच्या रुग्णालयामधील उपकरणांची नियमित तपासणी करण्यात येईल.
तसेच, ‘मॉकड्रील’ घेऊन कर्मचार्यांना सावध करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयात आग लागण्याच्या घटना कमी होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
रुग्णालयामध्ये आग लागत असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाने आता ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पालिका रुग्णालयांमधील विद्युत व अग्निशामक उपकरणांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणार्या पालिकेच्या विविध रुग्णालय इमारतींमध्ये असणारी विद्युत उपकरणे, त्या उपकरणांची असणारी स्थिती तपासण्यात येईल.
ती वापरण्यायोग्य आहेत किंवा नाही याची लेखी नोंद करावी लागेल. तसेच विद्युत वायरींचे काही ठिकाणी असणारे जाळे, वायरींची स्थिती, आर्थिंग तपासणी, स्विच गिअर, कंट्रोल पॅनल याची पडताळणी करण्यात येईल. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या नियंत्रणातील तांत्रिक कर्मचारी यांच्यासोबत समक्ष उपकरणांची पडताळणी करावी. तसेच त्याचा तपासणी अहवाल विद्युत विभागाचे सहशहर अभियंता यांच्याकडे द्यावा लागणार आहे.
रुग्णालयामध्ये आग लागल्यावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबत कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयामध्ये आग लागल्यास काय करावे व काय करू नये, यासाठी मॉकड्रील होईल. या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या माध्यमातून रुग्णालयातील आग लागण्याच्या घटना आटोक्यात आणण्यास मदत होणार असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.
Discussion about this post