व्हीएसआरएस मराठी न्युज –
त्रिवेणीनगर – तळवडे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची मालिका थांबता-थांबत नाही. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महापालिका व पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याचा संकल्प केला आहे.
आगामी आठ दिवसांत वाहतूक सुरक्षीत होण्याकरिता सर्व आवश्यक बाबी पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावर मंगळवारी पुन्हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा नाहक बळी गेला. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वाहतूक विभागाचे उपायुक्त बापू बांगर, पिंपरी-चिंचवड शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता ओंबासे, कार्यकारी अभियंता सिनकर, वाहतूक नियंत्रक बापू गायकवाड, तळवडे वाहतूक विभागाचे पी.आय. सुनील टोणपे यांनी रस्त्याची पाहणी केली. तसेच, अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी रस्ते डांबरीकरण करण्याचे त्याचप्रमाणे रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर सक्षम वाहतूक पोलीस व सक्षम वार्डन यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मदत करावी. अशा प्रकारची मागणी पोलीस अधिकारी व शहराचे अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच, वाहतूक विभागाचे ए.सी.पी.भास्कर ढेरे यांनी तळवडे गायरान जागेची पाहणी करून त्या परिसरात नियोजित ट्रॅफिक ए.सी.पी. ऑफिस करण्यात येईल अशा प्रकारची मागणी केली. याप्रसंगी ज्योतिबानगर इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष टीकाराम शर्मा, सचिव कीर्ती शहा, राजेश शर्मा व नीरज मंत्री उपस्थित होते.
Discussion about this post