व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आशीष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. सामान्य प्रशासनाचे सहआयुक्त मिलीन सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून महाराष्ट्र राज्य शासनाकडे शर्मा रुजू झाल्यानंतर प्रधान सचिव श्रेणीमध्ये अतिरिक्त पालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी निवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
शर्मा हे भारतीय प्रशासन सेवेतील 1997 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आयआयटी दिल्लीमधून बी. टेक. पदवी संपादित केल्यानंतर त्यांनी मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तर प्रशासकीय सेवेत आल्यानंतर ‘एम.एस्सी इन पब्लिक पॉलिसी अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन’ ही पदव्युत्तर पदवीदेखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून संपादित केली आहे. शर्मा यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशीमचे जिल्हाधिकारी, धाराशीवचे जिल्हाधिकारी, केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्र्यांचे खासगी सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर त्यांनी कामकाज केले आहे.
Discussion about this post