व्हीएसआरएस मराठी न्युज –निगडी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी गावठाण ते निगडी एसबीआय बँक या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम दीर्घकाळ सुरू असून सदर भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.या भुयारी मार्गास “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर” यांचे नाव देण्याची मागणी लढा युथ मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी केली आहे.
कै.मधुकर पवळे उड्डाणपुल ते जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुला दरम्यान असणार्या बहुचर्चित नवनिर्मित भुयारी मार्गाचे काम जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळापासून सुरू आहे.सदर भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी संबंधित ठेकेदार यांना देण्यात आलेला कार्यकाळ उलटून गेला असताना अद्यापही भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला होण्याकामी दिरंगाई होत असल्याने स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे लवकरात लवकर सदर भुयारी मार्गाचे उर्वरित काम पूर्ण करून त्यास भारतीय संविधानाचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादळी जीवनाला आपल्या अचाट धैर्याने संवर्धीत करणार्या व ज्यांच्या कणखर मनोबलामुळे देशसेवा आणि राज्यघटना निर्माणासारखे महानकार्य बाबासाहेबांना उभे करता आले अश्या बाबासाहेबांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सदर भुयारी मार्गास “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर”यांचे नाव भुयारी मार्गास देऊन तात्काळ लोकार्पण करावे असे प्रमोद क्षिरसागर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
Discussion about this post