Pimpri News : पिंपरी : नाशिक येथे दि. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारतर्फे राष्ट्रीय युवा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी यापूर्वी हा पुरस्कार मिळविलेले पिंपरी चिंचवडमधील अमित गोरखे आणि प्रवीण निकम यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
२८ वर्षाखालील तरुणांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र सरकारच्या युवा मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
अमित गोरखे यांना सन २०११/१२ मध्ये आणि प्रवीण निकम यांना २०१४/१५ मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे.
अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरात हजारो महिलांसाठी राबवलेले संगणक साक्षरता अभियान, त्याचबरोबर कलारंग संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या सांस्कृतिक कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. तर प्रवीण निकम यांनी केलेल्या लीडरशिप डेव्हलपमेंट व क्वालिटी एज्युकेशनसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
या विषयी बोलताना, अमित गोरखे म्हणाले सत्ताविसावा राष्ट्रीय युवा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्रामध्ये होतोय याचा आनंद आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्यांना निमंत्रण आले असून मलाही याचे निमंत्रण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत हा पुरस्कार सोहळा अनुभवायला मिळेल यासाठी विशेष आनंद आहे. हा महोत्सव म्हणजे भारतातील युवा चैतन्याचा जागरच असतो.
प्रवीण निकम म्हणाले दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार सोहळा एक नवीन उमेद देऊन जातो यावर्षी हा सोहळा महाराष्ट्रात होतोय याचा विशेष आनंद आहे.
Discussion about this post