Pimpri News : पिंपरी : चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे उदघाटन दि. ५ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील या शिबिराला भेट देणार आहेत अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी आज दि. ०३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार उमा खापरे, भाजपचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके, माजी स्थायीसमिती सभापती विलास मडिगेरी,राजू दुर्गे, तुषार हिंगे, राजेश पिल्ले आदी उपस्थित होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी ९ वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात केली होती. मागील वर्षी त्यांचे निधन झाले. तथापि त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमात खंड पडू न देता त्याला अधिक भव्य आणि व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. मागील वर्षी या शिबिराचा लाभ सुमारे २ लाख रुग्णांनी घेतला होता. यावर्षी ही संख्या ५ लाखांवर जाईल असा अंदाज या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप व्यक्त केला आहे.
शिबिरार्थींसाठी शिबीराच्या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून. शहर परिसरातील रुग्णांना तपासणीसाठी येणे सुलभ व्हावे म्हणून मोफत वाहनव्यवस्था करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने केली जात आहे.सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यामार्फत ऑफलाइन नोंदणी करून घेतली जात आहे. त्याबरोबर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्स माध्यमातून देखील ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.
महाराष्ट्रातील नामांकित रुग्णालयांची युनिट आणि सुमारे ६०० हून अधिक डॉक्टर्स, तज्ञ व पॅरामेडिकल स्टाफ शिबिरासाठी कार्यरत राहणार आहे. विविध रुग्णालयाचे २०० हून अधिक रोगनिदान स्टॉल उभारण्यात आले आहेत.
शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे तसेच, एक्स रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासण्या आणि डायलेसिसही मोफत करण्याची सुविधा आहे डायलेसीस सायकल पूर्ण करण्यात येणार आहे. रक्त तपासणीचा रिपोर्ट मोबाईलवर पाठवण्याची सुविधा केली आहे.
दिव्यांगांसाठी प्रथमच अत्याधुनिक प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय, जयपूर फूट, कॅलिपर्स तसेच दिव्यांगकरिता मोफत व्हीलचेअर्स, तीन चाकी सायकल, कुबड्या, स्टिक्स इत्यादी साहित्याचे नाव नोंदणी करून मोफत वाटप केले जाणार आहे.
शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्राथमिक स्वच्छतेसाठी फिरते शौचालय, पार्किंगसाठी व्यवस्था, चहा-नाष्टा, दोन वेळचे भोजन, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, अग्निशमनचे दोन बंब, प्रत्येक स्टॉलवर अग्निशमन यंत्र, सीसीटीव्हीसह सुरक्षा व्यवस्था, खासगी सुरक्षारक्षक आदी गोष्टी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभाथ्यांवर पात्र रुग्णांचे उत्पन्नाचे तसेच रहिवासी दाखले त्वरित उपलब्ध व्हावेत, यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत; अशी माहिती शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी यावेळी दिली.
नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर दि. ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवस हे शिबीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टसह विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी नियोजनात पुढाकार घेतला आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनकार्ड) आणि पूर्वी काही आजार असल्याच त्याचे कागदपत्रे व मेडिकल रिपोर्ट सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी ९८५०१७११११ आणि ७५७५९८११११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही रुग्णालये होणार सहभागी
या शिबिरामध्ये ससून हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, वायसीएम, टाटा मेमोरीअल, मुंबई, कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल, आदित्य बिर्ला, जहांगीर, दिनानाथ मंगेशकर, सह्याद्री, संचेती, पुना हॉस्पिटल, भारती, इन्लॅक्स बुधराणी इन्स्टिट्यूट, एच. व्ही. देसाई, व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य, चिंचवड, एम्स हॉस्पिटल, सिंम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, एमआयएमईआर मेडिकल कॉलेज, डॉ. बीएसटीआर हॉस्पिटल, श्रीमती काशीबाई नवले, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, रुबी अलकेअर, देवयानी, ओम, श्री हॉस्पिटल क्रिटीकेअर आणि तृमा सेंटर, कोहाकडे, सनराईज, आयुर्वेदिक न्युरो थेरपी, नारायण धाम, नॅशनल आयुष मिशन, स्टर्लिंग, ज्युपिटर, सूर्या मदत अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशी महाराष्ट्रातील नामांकीत रुग्णालये सहभागी होणार आहेत.
कॅन्सरसह विविध तपासण्या होणार मोफत….
शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, एक्स रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासण्या आणि डायलेसीसही मोफत करण्याची सुविधा आहे. यासह हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण किडनी, विकास व प्रत्यारोपण, कॉक्लिअर इन्प्लान्ट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदूची शस्त्रक्रिया, आयुर्वेद उपचार, मुत्र मार्गाचे विकार, त्वचा विकार, फाटलेली टाळू व ओठांवरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलीप्सी फिट येणे, कान-नाक-घसा, अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, स्त्री रोग, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, मोफत अँन्जोग्राफी, अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, मोफत चष्मे वाटप, आयुर्वेदिक, न्युरोथेरेपी, आयुर्वेद, योगा, नॅकोपॅथी, युनानी सिद्धा होमिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक थेरेपी अशा सुविधा शिबिरात उपलब्ध असणार आहेत.
Discussion about this post