Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत 346 मालमत्ता सील, 538 मालमत्तांवर जप्ती अधिपत्र डकविले, 128 मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित अशा 1 हजार 12 मालमत्ता धारकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले आहे. उर्वरित दिड महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. उर्वरित दिवसात मालमत्ता सिल करणे, जप्त करणे आणि नळ कनेक्शन बंद करणे याचे दैनंदिन उद्दिष्ट किमान 500 आहे. या गतीने पन्नास हजारावरील थकीत रकमा असलेल्या सर्व मालमत्ता 31 मार्चपर्यंत जप्त किंवा सिल होणार आहेत. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः आर्थिक स्थिती असूनही 8 ते 10 वर्षे कर न भरलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. पालिकेच्या विकासाचे दृष्टीने ही हानिकारक बाब आहे
पिंपरी चिंचवड शहरात 6 लाख 15 हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 4,31,000 मालमत्ता धारकांनी तब्बल 746 कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
Discussion about this post