Pimpri News : चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी प्रेयसी या संकल्पनेवर आधारित छायाचित्रित केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन दि. १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांना विनामूल्य पाहता येईल.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गीतकार, कवी गुरु ठाकूर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कला दिग्दर्शक महेश कुडाळकर, चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.
आपल्या या प्रदर्शनाविषयी बोलताना कशाळीकर म्हणाले, ‘प्रेयसी म्हणजे व्यक्ती नाही. ती एक संकल्पना आहे. चेहर्यापलिकडे असलेली, प्रत्येकाने मनात जपलेली अशी एक आवडती प्रतिमा आहे.या प्रेयसी’चा मागोवा घेण्यासाठी आम्ही देशभरातील विविध राज्यात विशेषतः महाराष्ट्र सह लडाख, कर्नाटक, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन थंडी, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत छायाचित्रे घेतली आहेत.प्रेयसी आणि निसर्ग यांचं नातं छायाचित्र प्रदर्शनातून कला रसिकप्रेक्षकांसाठी सादर केलं आहे.’
या छायाचित्रांना कवी गुरु ठाकूर यांनी “अशी चढती दुपार सखे सांभाळ पदर तुझ्या गजऱ्याने दिली उभ्या रानाला खबर ” “नको उधळत जाऊ असा रूपाचा कहर तुझ्या पाठीला खिळली उभ्या रानाची नजर असा शब्दसाज चढविला आहे.
देवदत्त कशाळीकर यांच्याविषयी
देवदत्त कशाळीकर हा हरहुन्नरी प्रयोगशील कलाकार आहे. भारत सरकारचा युवक कल्याण मंत्रालयाचा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त पुणे जिल्ह्यातील या छायाचित्रकाराला निकॉन पुरस्कार, कॅनन पुरस्कार, जगदीश खेबूडकर पुरस्कार, मोरया पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया पुरस्कार, वसुंधरा फिल्म पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २८ पेक्षा जास्त वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देवदत्त यांनी पिंपरी चिंचवड महानगपालिका प्रसिद्धी विभागासाठी २० वर्षे काम केले आहे. आजवर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक विषयावर फोटोग्राफी प्रदर्शने आयोजित केली आहे. सध्या डॉक्युमेंट्री फिल्म मेकिंग प्रकारात कार्यरत आहेत. अनेक नामवंत वृत्तसंस्था, नामांकित चॅनलसाठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत आहेत. अतुल्य भारत या विषयावर पूर्ण भारताचे सांस्कृतिक चित्रीकरण करण्याचा त्यांचा प्रकल्प सुरू आहे.
Discussion about this post