व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: निगडी अमरधाम स्मशानभूमी पासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने केबलसाठी विनापरवाना खोदकाम करण्यात आले. त्यामुळे खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका खैरनार यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,निगडी अमरधाम स्मशानभूमी समोरील रस्त्यावर ठेकेदाराकडून केबलसाठी बेकायदा खोदकाम करण्यात आले. तसेच या खोदकामातून निघालेला मातीचा राडारोडा रस्त्यावर टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. खोदकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स, ब्लिंकर, सुचना फलक नाहीत. गेल्या ३ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाच्या अनियमिततेमुळे आक्षेप घेतला होता. तसेच नागरीकांच्या तक्रारीनंतर आम्ही संबंधित खोदकामाच्या ठिकाणी जात खोदकाम करीत असलेल्या मजुरांकडे खोदकामाच्या परवाण्याबाबत विचारणा केली. पण, त्यांच्याकडे परवाना नव्हता. दरम्यान, सदर कामासाठी ठेकेदाराने नेमलेले सुपरवायझर मयुर जाधव तसेच महापालिकेच्या झो.नि.पू विभागाचे समीर दळवी यांना आम्ही संपर्क साधला असता त्यांच्याकडून सदर कामासाठी खोदकामाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे या सर्व प्रकारातून ‘कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बिनधास्तपणे कोणीही या आणि रोडची खोदाई करा’ असेच दिसून येत आहे. तरी या तक्रारीची दखल घेऊन बेकायदेशीररित्या खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
Discussion about this post