व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.पवार म्हणाले, शासकीय इमारती जनतेने दिलेल्या कराच्या पैशातून उभ्या राहतात, त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो. त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि इथे येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी. काम करताना लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची आवश्यकता आहे. विकासाची कामे करताना गोरगरीबांनाही त्याचा उपयोग होईल याची दक्षता घेण्यात येईल.
पंचायत समितीच्या इमारतीत बँकेसह इतरही सुविधा देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतून दूरदृश्य प्रणालीची सुविधा देण्यात येणार आहे, त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल. ही इमारत राज्य आणि देशातील पंचायत समितीची भव्य इमारत असावी. इमारतीच्या माध्यमातून चांगले काम उभे राहावे.
पंचायत समितीच्या कामकाजाचे वेगळे महत्त्व आहे. लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यामुळे राज्यात पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात रुजली. याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली. लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली.
कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प. अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, न.प.अध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे आदी उपस्थित होते.
Discussion about this post