व्हीएसआरएस मराठी न्युज । अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ड्युटीच्या वेळेत कार्यालयात येण्यासाठी आणि जाण्यासाठी आता बायोमेट्रिक हजेरीला आधारकार्डही अनिवार्य केले आहे.
याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्याने स्मार्ट ओळखपत्र देण्यात येणार असून, कार्यालयात आल्यावर आणि जाताना आधारकार्डमधील शेवटचे आठ क्रमांक टाकून नंतर थंब एम्प्रेशन करावे लागणार आहे. ही यंत्रणा थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन पत्रकाच्या प्रणालीस जोडण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयासोबतच उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे 18 हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतात.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ड्युटीवर यावे यासाठी महापालिकेने वेळोवेळी नवनवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली आहे. परंतु या यंत्रणेतील त्रुटी शोधून त्यावर मात करणाऱ्या काही मंडळींमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युटीवर येण्याजाण्याच्या वेळेवर अधिक नियंत्रण आणण्यासाठी सध्याची बायोमेट्रिक हजेरीची पद्धत आणखी अपग्रेड केली आहे. बायोमेट्रिक हजेरीसोबत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आधारकार्डही अनिवार्य केले आहे.
आधारकार्ड, छायाचित्र व अन्य माहितीची नोंद असलेले स्मार्टकार्ड प्रत्येकाला देण्यात येणार आहे. कार्यालयात हजेरी लावताना व ड्युटीवरून घरी जाताना दोन्ही वेळेस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधारकार्डमधील शेवटचे आठ क्रमांक डायल करून थंब इम्प्रेशन करावे लागणार आहे. यासाठी सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागामध्ये या प्रणालीसाठी एक नोडल ऑफिसर नेमण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
Discussion about this post