व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे 200 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या ये-जा करतात. त्याद्वारे लाखो प्रवाशांची वाहतूक होते.
मात्र, अनेकदा रेल्वे गाड्यांना उशीर होतो. त्या वेळी स्थानकावर लवकर पोहोचलेल्या प्रवाशांना गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्मवरच वेळ काढावा लागतो. त्यावेळी दमलेले अनेक प्रवासी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जागा मिळेल तिथे झोपतात. त्यामुळे येथून ये-जा करणार्या इतर प्रवाशांना अडचण होते. त्या वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान (आरपीएफ) झोपलेल्या प्रवाशांना हटकतात.
अशातच एका आरपीएफ जवानाने काठीचा वापर न करता, पाण्याच्या बाटलीतून पाणी ओतून प्रवाशांना उठविण्याची शक्कल लढविली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे
रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या भागातील सामान्य वर्गातील असतात. अनेकांना प्रतीक्षालयाचे तिकीट काढणे परवडत नाही. ज्या प्रवाशांना परवडते असे प्रवासी प्रतीक्षालयात बसतात. तर ज्यांना परवडत नाही, ते प्रवासी जागा मिळेल तिथे थांबतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांकरिता सुसज्ज मोफत प्रतीक्षालये उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांनी अशाप्रकारे प्लॅटफॉर्मवर झोपून इतर प्रवाशांचा रस्ता अडवू नये. प्रवासी आमचे दैवत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना त्रास होईल, अशी वर्तणूक करणार नाही. प्रवाशांना उठवण्यासाठी आमच्या एका कर्मचार्याने पाणी टाकून उठवले. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील संबंधित कर्मचार्याला असे प्रकार करू नयेत, अशा कडक सूचना दिल्या आहेत, असे आरपीएफ अधिकार्यांनी सांगितले.
Discussion about this post