Pune News : पुणे : मोटारसायकलला मॉडीफाईड सायलेन्सर लावून वेगाने मोटारसायकल पळवत ध्वनीप्रदूषण करणार्या ६१९ जणांवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. यासाठी २९ ते ३१ मार्च या काळात खास मोहीम राबविण्यात आली होती. या शिवाय असे सायलेन्सर बसवून देणार्या ३१६ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
मोटारसायकलीच्या सायलेन्सर मध्ये फेरबदल करून कर्णकर्कश्य आवाज करत रात्री अपरात्री ‘बुंगाट’ मोटारसायकली पळवणार्या ‘बुलेटराजांना’ चाप लावण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.तावडीत सापडलेल्या ६१९ मोटारसायकलींचे सायलेन्सर काढून घेण्यात आले असून चालकांना दंड करण्यात आला आहे.
या मोहिमेमध्ये परिमंडळ १ मधील फरासखाना – १८, विश्रामबाग – ४, खडक – ०८, स्वारगेट- १३, सहकारनगर- ०७, भारतीविद्यापिठ – ३७, सिंहगड रोड- २९, दत्तवाडी – १६, वारजे – १६ कारवाई, वाहतूक परिमंडळ २ मधीलकोथरुड – १७, डेक्कन- २१, चतुःश्रृंगी – १३, शिवाजीनगर- १४, खडकी- ४१, येरवडा – २८, विमानतळ- ३३, कोरेगाव पार्क – ३६, लोणीकंद – २० कारवाई व वाहतूक परिमंडळ ३ मधील समर्थ – १२, बंडगार्डन- १२, लष्कर- ०६, वानवडी – २१, कोंढवा – २५, हांडेवाडी – ३३, हडपसर – ४४, मुंढवा- ८५ व लोणीकाळभोर- १० या प्रमाणे मोटारसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर सायलेन्सरमध्ये फेरबदल करून देणार्या ३१६ जणांवरही कारवाई करण्यात करण्यात आली आहे. मोटार सायकलचे सायलेन्सर मॉडीफाय करणारे गॅरेजवाले आणि मॉडीफाईड सायलेन्सर विक्रेते यांना हे प्रकार बंद करण्यास फर्मावण्यात आले आहे.
मॉडीफाईड सायलेन्सर लावून मोटारसायकली दामटणार्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअॅप क्रमांक ८०८७२४०४०० यावर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी असे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
Discussion about this post