Pune News : पुणे : मंगळवारी रात्री हडपसर येथील हिंदुस्थान पेट्रोलपंपाच्या मागे दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या एका टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने बेड्या ठोकल्या.
अमन संजय दिवेकर (वय 22, इंदिरानगर,पुणे), विशाल संजय लोखंडे (वय 24 रा.इंदिरानगर, पुणे) व विधीसंघर्षीत बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर येथील हिंदुस्थान पेट्रोलपंपाच्या मागे मोकळ्या जागेत काही जण गुन्हा करण्याच्या तयारीने एकत्र जमले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा घातला असता तिघेजण पोलिसांच्या हाती लागले. बाकीचे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मिरची पावडर , नायलॉनची दोरी, घातक शस्त्रे, कोयते असे गुन्हे करण्यासाठीचे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी हाती लागलेल्या तिघांकडे कसून तपास केला असता त्यांनी पेट्रोलपंपाची टेहळणी केली होती. आणि पंपावरील रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत ते होते असे निष्पन्न झाले.
पोलीस तपासात कोंढवा, हडपसर, वानवडी, स्वारगेट, बिबेवाडी, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यात आरोपींवर जबरी चोरीचे एकूण 18 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा पाचच्या पथकाने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
Discussion about this post