Pune News : पुणे : निवडणूक कामकाजासाठी आवश्यकता असून ही पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि इतर शासकीय कार्यालयातील निवडणूक कामगिरीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अद्यापही हजर झालेले नाहीत. तसेच या दोन्ही महापालिका आणि शासकीय कार्यालये यांना यासबंधी नोटीस बजावूनही त्यांनी नोटीसीला उत्तर देण्याची तसदीही घेतलेली नाही ही बाब जिल्हा निवडणूक शाखेचा आढावा घेतल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आली असून त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक कामगिरीसाठी नियुक्त ५४२ कर्मचारी २४ तासात निवडणूक कामासाठी दाखल झाले नाहीत तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणूक नजरेच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे राव यांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर शासकीय खात्यांमधील ५४२ कर्मचार्यांची नियुक्ती निवडणूक कामगिरीसाठी झाली असतानाही ते अद्याप कामाच्या ठिकाणी हजर झाले नसल्याचे उघड झाले. निवडणूक शाखेने यासंदर्भात दोन्ही पालिका आणि संबंधित खात्यांकडे केलेल्या पत्रव्यवहारालाही दाद दिली नसल्याचे उघड झाल्यामुळे राव यांनी हे कठोर पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post