Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील जैनमंदिराच्या रखवालदाराला मारहाण करून त्याचे हातपाय बांधत तीन अज्ञात दरोडेखोरांनी मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम सुमारे २ लाख रुपये आणि श्री पद्मावती देवीच्या मूर्तीवरील दागिने लुटले. ही घटना २० एप्रिलच्या पहाटे घडली.
पोपट सोनबा घनवट (वय ७२, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे मारहाण झालेल्या रखवालदाराचे नाव असून त्याच्या तक्रारीवरून शिरुर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणाचा तपास चालू केला आहे.
शिरुर येथील कापडबाजारात असलेले श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर हे ऐश्वर्यसंपन्न मंदिर आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाने सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यापैकी पोपट घनवट हे एक आहेत. ते शनिवारी रात्रपाळीस होते. पहाटेच्या सुमारास मंदिराच्या मागील बाजूने तीन दरोडेखोरांनी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. तेथे पहारा देणार्या घनवट यांना लोखंडी टॉमीने मारहाण करत खाली पाडले. आणि त्यांच्या छातीवर स्क्रूड्रायव्हर रोखत मंदिराच्या चावीची मागणी केली. परंतु चावी आपणाकडे नसून ती पुजार्याकडे आहे असे सांगितल्यावर दरोडेखोरांनी घनवट यांचे हातपाय बांधून दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून मंदिरात प्रवेश केला. दानपेटीचे कुलूप तोडून आतील रक्कम काढून घेतली. तसेच, श्री देवी पद्मावतीच्या मूर्तीवर असलेले दागिने काढून मागील दरवाजाने पळ काढला.
या प्रकाराची माहिती मिळताच शिरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post