Pune News : पुणे : ठाणे अॅन्टीकरप्शन कार्यालयाने ६ मार्च रोजी वाहन चाचणी केंद्र, दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे येथे सापळा रचून एका आरटीओ एजंटला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ‘रंगेहाथ’ पकडले आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयामध्ये एजंट म्हणून काम करणारे तिघे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे पुणे, पिंपरी चिंचवड आरटीओमध्ये खळबळ माजली आहे.
जावेद अकबर शेख, वय ३३ वर्षे याला अटक करण्यात आली आहे. तो पुणे आरटीओमध्ये एजंट म्हणून व्यवसाय करत असून त्याचा रेडियम स्टिकर नंबरप्लेट विक्रीचाही व्यवसाय आहे. तर, देवेंद्र खिंवसरा, गिरीश भोगळे, ४) भावडया चौधरी हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आरटीओ एजंट म्हणून काम करणारे तिघे फरार झाले आहेत.
या प्रकरणी एका ट्रान्स्पोर्ट कार्यालयामध्ये काम करणार्या व्यक्तीने ठाणे अॅन्टीकरप्शनकडे तक्रार दिली होती. त्यांच्या ट्रान्स्पोर्टच्या पाच गाड्यांवर ओव्हरलोडींगची कारवाई न करण्यासाठी प्रत्येक गाडीसाठी चार हजार या प्रमाणे २० हजार रुपयांची लाच आरटीओ अधिकार्याला देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे मागितली होती.
तक्रारदाराने याची तक्रार दिल्यानंतर ठाणे अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी सापळा रचला. जावेद शेख याला वाहन चाचणी केंद्र, दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे येथे मोकळ्या जागेत २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणाशी संबंधित अन्य तिघे फरार झाले आहेत.
या प्रकरणी सासवड, जि. पुणे येथील पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील लाचखोरी चर्चेत आली असून ज्या अधिकार्यासाठी ही लाच स्वीकारली जात होती त्याच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. सासवड पोलिसांनी फरार आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे
Discussion about this post