Pune News : पुणे : कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे प्रताप आता सोशल मीडियावरून चर्चिले जाऊ लागले आहेत. माजी मंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवरून तीन संदेश प्रसारित केले आहेत. त्यात त्यांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाचे प्रताप कथन केले आहेत.
त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.
ब्रह्मा बिल्डर्सचे मालक विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलाने १८ मे रोजी रात्री पोर्श या अलिशान गाडीने उडवून एक तरूण आणि एका तरुणीचा बळी घेतला. त्यानंतर बाल न्यायहक्क मंडळाने त्याची सुटका केली. नागरिकांमध्ये या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली येरवडा पोलीसठाण्यासमोर आंदोलन झाले. लोकक्षोभ इतका निर्माण झाला की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल २१ मे रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेत पोलीसांची पाठराखण करावी लागली. मात्र तरीही हे प्रकरण शमण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज या प्रकरणावर भाष्य केले आहे.
दरम्यान या प्रकरणात या मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. दोन पब तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले असून पबचे मालक, व्यवस्थापक आणि काही कर्मचार्यांना अटक केली आहे.
Discussion about this post