नवी दिल्ली । व्हीएसआरएस न्यूज ।
राज्यसभेतील १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यात काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. या निलंबित १२ खासदारांचे संसदेच्या परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू आहे. निलंबन मागे घ्यावे, अशी या खासदारांची आणि सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. राऊत यांचा खुर्ची देतानाचा हा फोटो व्हायरल झाला. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना आपल्या सारखं मांडी घालून बसता येत नाही. त्यांना त्रास होतो. यामुळे आपण त्यांना खुर्ची आणून दिली. पितृतुल्य वडिलधाऱ्या व्यक्तीला खुर्ची आणून दिली. शरद पवार यांच्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव किंवा इतर ज्येष्ठ नेते असते तरीही त्यांना खुर्ची आणून दिली असती. राजकीय विरोधक असले तरी ते ज्येष्ठ आणि पितृतुल्य आहेत. पण यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
खुर्ची देणं सोडून द्या. पण अडवाणींना आपल्यासमोर उभं केलं नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे गुरू. त्यांच्याकडूनच मोठ्यांचे आदर करण्याचे संस्कार आपण घेतले. प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नये. हे XXXX लोकांना समजत नाही. ही XXXX बंद करा. यामुळे महाराष्ट्रात तुमची सत्ता कधीच येणार नाही. तमुच्या डोक्यातला कचरा साफ केला नाही तर लोकं एखाद्या डंपिंग ग्राउंडमध्ये टाकून तुम्हाला गाडतील. असेच विचार असतील तर तुम्हाला फुले, आंबेडकर, शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारी नाही, असं संतप्त झालेल राऊत म्हणाले.
Discussion about this post